नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:43 AM2024-10-07T10:43:36+5:302024-10-07T10:44:23+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढल्याचं चित्र पुढे येत आहे.
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपामध्ये दुरावा वाढताना दिसत आहे. त्यातच लोकशक्ती जनता पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. ज्यातून बिहारच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून भाजपा कोट्यातील मंत्र्यापासून दूर राहत आहेत. या मंत्र्यांना भेट देणेही मुख्यमंत्री टाळत आहे. नितीश कुमारांच्या अशा वागण्यानं भाजपाही हैराण आहे. मात्र दोन्हीही पक्ष याबाबत बोलायला तयार नाहीत.
यातच चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे. चिराग यांनी ट्विट करत शाहांसोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट केला. सध्याची राजकीय परिस्थिती आणि येत्या काळात विविध राज्यांच्या निवडणुका यावर दोघांमध्ये चर्चा झाली. चिराग पासवान यांची ही भेट बिहारमध्येच चर्चेत आहे असं नाही तर झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही या भेटीला महत्त्व आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात नितीश कुमार यांचा जेडीयू, चिराग यांचा लोजपा हे दोन्हीही पक्ष भाजपासोबत मिळून झारखंडच्या निवडणूक मैदानात उतरू इच्छितात.
झारखंडमध्ये आधीपासून भाजपा आणि आजसू यांच्यात आघाडी आहे. तरीही भाजपा जेडीयूला सोबत घेईल असं बोललं जाते. चिराग पासवानही एनडीएसोबत आहेत तेदेखील झारखंडमध्ये निवडणूक लढवणार आहेत. सप्टेंबर महिन्यात चिराग पासवान यांनी झारखंड विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. पक्ष स्वबळावर लढणार की आघाडी करून त्यावर विचार विनिमय बाकी आहे. आता जेडीयू भाजपासोबत आलीय त्यामुळे भाजपा चिराग पासवान यांना झारखंडच्या निवडणुकीत सोबत घेणार का हे पाहणं गरजेचे आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात जेडीयू, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, तेलुगु देशम पार्टीचे चंद्राबाबू नायडू हे सत्तेत आहेत. या ३ पक्षांच्या साथीने केंद्रात भाजपाच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे. इतिहास पाहिला तर या तिन्ही पक्षांनी वेळोवेळी भाजपाची साथ सोडली आहे. टीडीपीने याआधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. २०१४ साली टीडीपीने भाजपासोबतची युती बनवली परंतु २०१९ मध्ये ती भाजपाविरोधी बनली. टीडीपी आज पुन्हा भाजपासोबत आहे. नितीश कुमारही कधी जातील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे एनडीए सरकारमधील भाजपाला सावध पाऊले उचलावी लागत आहेत.