chhattisgarh assembly election 2018: काँग्रेसचा गड 'क्रॅक' करण्यासाठी भाजपाकडून IAS अधिकाऱ्याला तिकीट

By वैभव देसाई | Published: October 30, 2018 09:13 AM2018-10-30T09:13:07+5:302018-10-30T10:06:02+5:30

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असतानाच आता निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. 

BJP ticket for IAS officer to break the Congress Kharsia constituency | chhattisgarh assembly election 2018: काँग्रेसचा गड 'क्रॅक' करण्यासाठी भाजपाकडून IAS अधिकाऱ्याला तिकीट

chhattisgarh assembly election 2018: काँग्रेसचा गड 'क्रॅक' करण्यासाठी भाजपाकडून IAS अधिकाऱ्याला तिकीट

Next

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असतानाच आता निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता आहे. 15 वर्षं निर्विवाद राज्य केल्यानंतर रमण सिंह यांनी छत्तीसगडची सत्ता राखण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. मध्य प्रदेशमधून विभक्त झाल्यानंतर छत्तीसगड हे राज्य निर्माण झालं, तेव्हापासून भाजपाचे रमण सिंह या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत. 2003च्या निवडणुकीपासून दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदावर असल्यानं सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचं स्थान आहे. त्यामुळेच चौथ्यांदा सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या कामावर प्रभावित होऊन प्रशासकीय अधिका-यांनीही राजकारणात येण्यास सुरुवात केली. असेच एक आयएएस दर्जाचे अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात सक्रिय झाले आहेत. ते दुसरे तिसरे कोणी नसून रायपूरचे माजी कलेक्टर ओ. पी. चौधरी आहेत. ओ. पी. चौधरी हे 2005च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. भाजपानं त्यांना खरसिया विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. त्यांनी या क्षेत्रातील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांवर प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांची भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाली. त्यानंतर रमण सिंह यांच्या मध्यस्थीनं त्यांना भाजपात आणण्यात आलं. तेव्हापासून ते खरसिया विधानसभा क्षेत्रात कार्यरत आहेत. खरसिया मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपाकडून नरेश पटेल, राजेश शर्मा, विजय अग्रवाल, महेश साहू, कमल गर्ग, श्रीचंद रावलानी अशा दिग्गजांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु सर्वांना डावलून भाजपानं ओ. पी. चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. खरसियाचे विद्यमान आमदार उमेश पटेल ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ओ. पी. चौधरीही त्याच अघरिया समाजाचे आहेत. चौधरी हे शेतकरी कुटुंबातून येत असल्यानं शेतक-यांवरही त्यांचा मोठा प्रभाव आहे. चौधरी यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.

दंतेवाडा येथे प्रशासकीय अधिकारी असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी भरीव काम केले. रायपूरच्या जनतेकडूनही त्यांच्या कामाचं सदोदित कौतुक होत असतं. चौधरी हे अघरिया समाजातील तरुण पिढीसाठी आदर्श आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत खरसिया मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. खरसिया मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. परंतु काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यास ओ. पी. चौधरी यांनी सुरुवात केली आहे. आयएएस अधिकारी असताना चौधरी हे या मतदारसंघात सक्रिय होते. इथल्या लोकांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. खरसियामधले वाढते औद्योगिकीकरण, प्रदूषण, शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभाराला जनता कंटाळली आहे. तसेच या क्षेत्रातील अनेक उच्चशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. ते सर्वच तरुण चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वानं प्रभावित झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला यंदा खरसियाची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघातून 1990मध्ये काँग्रेसकडून नंदकुमार पटेल यांनी निवडणूक लढवली होती आणि 2013पर्यंत ते इथले आमदार होते. पाच वेळा विधानसभेवर निवडून येत त्यांनी 22 वर्षं खरसिया मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड एकत्र राज्य असताना काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं. 2013मध्ये बस्तरमधल्या झीरम घाटीमध्ये नक्षलींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे पुत्र उमेश पटेल यांना 2013मध्ये काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि निवडून आणलं. खरसिया या मतदारसंघात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 40 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. तसेच अघरिया समाज, शाहू समाजाचंही प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयी ठरतं याची राजकीय वर्तुळात अनेकांना उत्कंठा आहे.

Web Title: BJP ticket for IAS officer to break the Congress Kharsia constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.