जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 09:52 PM2024-11-08T21:52:47+5:302024-11-08T21:54:19+5:30

20 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान संपताच, 22 नोव्हेंबरला दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठी बैठक बोलावण्यात आली आहे.

BJP to get new national president in January; Important meeting in Delhi on November 22 | जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

BJP National President : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका संपताच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. या संदर्भात भाजपने येत्या 22 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व प्रदेशाध्यक्षांसह संघटनेशी संबंधित सुमारे 125 प्रमुख नेत्यांची संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कार्यशाळा होणार आहे. ही बैठक भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बोलावली असून, त्यात गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहतील.

राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण आणि संघटनेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले तीन सह-निवडणूक अधिकारी यांच्या व्यतिरिक्त सर्व राज्यांमध्ये नियुक्त केलेले राज्य निवडणूक अधिकारी आणि सह-अधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बैठकीत देशभरातील सक्रिय सदस्य प्रमुखांनाही पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत बोलावण्यात आलेल्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि भेट देणाऱ्या नेत्यांना स्थानिक सक्रिय सदस्यत्व मोहिमेपासून सुरुवात करून आतापर्यंत झालेल्या सर्व संघटनात्मक निवडणुकीसंबंधीच्या कामांची तपशीलवार माहिती आणण्यास सांगण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रीय अपील समितीची स्थापना
याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजप संघटनेचे केंद्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी राष्ट्रीय अपील समितीची स्थापना केली आहे. राधामोहन सिंग यांना या समितीचे निमंत्रक बनवण्यात आले आहे, तर भाजपचे तीन ज्येष्ठ नेते विजयपाल सिंग तोमर, संजय भाटिया, गजेंद्र पटेल यांना राष्ट्रीय अपील समितीचे सहसंयोजक बनवण्यात आले आहे. भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ही अपील समिती काम करते.

शाहांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत प्रगती अहवाल घेतला 
गेल्या मंगळवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वेग वाढवण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपचे संघटन मंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यवार संघटनात्मक निवडणुकांचा प्रगती अहवाल घेतला. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया गतिमान करण्याची योजना आखण्यात आली.

15 जानेवारीपर्यंत मिळणार नवीन अध्यक्ष
22 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करून पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया गतिमान करण्याचा आणि राष्ट्रीय अपील समिती स्थापन करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, असे मानले जात आहे. म्हणजेच 15 जानेवारीनंतर पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो.


 

Web Title: BJP to get new national president in January; Important meeting in Delhi on November 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.