भाजप बिहार दिनाचे सोने करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 07:25 IST2025-03-14T07:25:00+5:302025-03-14T07:25:12+5:30
भाजप हा उत्सव २२ मार्च ते ३० मार्च, असा आठवडाभर साजरा करणार आहे.

भाजप बिहार दिनाचे सोने करणार
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजना आखायला सुरवात केली आहे. बिहार दिनाचे औचित्य साधून भाजप विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती आहे.
भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजप बिहारच्या अस्मितेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. २२ मार्च बिहार दिवस म्हणून पाळला जातो. भाजप बिहारच्या अस्मितेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. २२ मार्च बिहार दिवस म्हणून पाळला जातो. भाजप हा उत्सव २२ मार्च ते ३० मार्च, असा आठवडाभर साजरा करणार आहे.
एक भारत, श्रेष्ठ भारत आणि स्नेहसंमेलन, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या मतदारांच्या जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. बिहारची संस्कृती आणि परंपरा यासोबतच बिहारचा गौरव दर्शविणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात नृत्य, पारंपरिक संगीत, भोजन संस्कृती यावर भर दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, बिहार दिनाचे कार्यक्रम केवळ बिहारमध्येच नव्हेत, तर ज्या ज्या ठिकाणी बिहारी नागरिकांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी ते घेतले जाणार आहेत.
खरी होळी नोव्हेंबरनंतर...
१) भाजपच्या कार्यक्रमांचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा, यासाठी बिहार दिनाच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जाणार आहेत.
२) दुसरीकडे, रालोआचा घटक पक्ष लोक जन शक्ती पक्षाचे प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान हेही मैदानात उतरले आहेत. पासवान उद्या पाटणा येथे होळी मिलन कार्यक्रमात आई रिना पासवान यांच्यासह सहभागी होणार आहेत.
३) बिहारमध्ये यंदाची खरी होळी नोव्हेंबरनंतर साजरी केली जाईल, जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत रालोआचा विजय होईल, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.