भाजपाचा आज देशभर ‘विजय दिन’
By admin | Published: February 25, 2017 12:33 AM2017-02-25T00:33:24+5:302017-02-25T00:33:24+5:30
महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला शानदार विजय तसेच ओडिशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधे दमदार उपस्थिती दाखवून दिल्यामुळे
सुरेश भटेवरा , नवी दिल्ली
महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला शानदार विजय तसेच ओडिशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधे दमदार उपस्थिती दाखवून दिल्यामुळे नोटाबंदीला देशातल्या जनतेचा पाठिंबा आहे हा संदेश देशभर देण्यासाठी भाजपातर्फे उद्या, २५ फेब्रुवारीला देशभर जिल्हा मुख्यालयात विजय दिवस साजरा केला जाणार आहे.
उत्तर प्रदेशात ३ टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. या काळात विशेषत: पूर्वांचलातल्या मतदारांना लक्ष्य बनवून महाराष्ट्रातल्या विजयाचा प्रचार घडवला जाईल याचे संकेत पंतप्रधानांच्या सभांमधून मिळत आहेत. मुंबई व महाराष्ट्रातले २६ टक्के मतदार पूर्वांचलशी संबंधित आहेत. गोंडा येथील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस साफ झाला आहे. तो कुठेही दिसत नाही. ओडिशा, मुंबई व महाराष्ट्रासह चंदीगडच्या निवडणुका, गुजरातच्या पंचायतींसह कर्नाटकातल्या निवडणुकांचे निकाल पाहा, गेल्या तीन महिन्यांत जिथे निवडणुका झाल्या, तिथे जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले आहे.
मुंबई, महाराष्ट्र, चंदीगड, ओडिशात भाजपाने जिंकलेल्या जागा व अन्य पक्षांना मिळालेल्या जागांच्या तुलनात्मक तक्त्याचा सोशल मीडियासह तमाम माध्यमातून जोरदार प्रचार घडवण्याबरोबर विजय दिनाच्या निमित्त पोस्टर्स सर्वत्र झळकवण्याचा भाजपाचा इरादा आहे.