"भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली, आता गोंधळ घालण्याची काय गरज?': नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:18 PM2022-06-13T15:18:53+5:302022-06-13T15:19:13+5:30
''नुपूर शर्मावर भाजपने कारवाई केली आहे, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, काहीजण जाणूनबुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत."
पाटणा: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशासह विदेशातही गदारोळ सुरू आहे. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. "भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली आहे, मग आता एवढा गदारोळ करण्याची काय गरज आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
माध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले, "नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने आधीच कारवाई केली आहे. नुपूर शर्मावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे असूनही, हिंसक घटना होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोकांना जाणूनबुजून आपापसात भांडण लावायचे आहेत. कोणतीही गोष्ट नैसर्गिक होत नसते, त्यामागे कोणीतरी सूत्रधार असतो," असे ते म्हणाले.
'बिहारमध्ये कोणताही वाद नाही'
नितीश कुमार पुढे म्हणाले की, देशभरात सुरू असलेल्या वादाचे बिहारमध्ये पडसाद नाहीत. बिहारमध्ये कोणत्याही वादाचे वातावरण नाही. रांची हिंसाचाराच्या वेळी बिहार सरकारचे मंत्री नितीन नवीन यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि आवश्यक कारवाई करण्याची जबाबदारी झारखंड सरकारची आहे. बिहार सरकारने हा मुद्दा तातडीने झारखंड सरकारकडे मांडला आहे, असेही ते म्हणाले.
अनेक शहरांमध्ये हिंसाचार
नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केले होते, यानंतर बराच वाद झाला. अरब देशांनीही नुपूरच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, शुक्रवारी दिल्ली, रांची, लखनौ, प्रयागराज, कोलकाता येथे नूपूर शर्माविरोधात निदर्शने झाली. निदर्शनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला. सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली. रांची येथील हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील जामा मशिदीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे, यूपीच्या प्रयागराजमध्ये हिंसाचार उग्रपणे पसरला. येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.