BJP trolls Nitish Kumar: भाजपाने नितीश कुमारांना केलं ट्रोल; Amitabh Bachchan यांचा 'हा' व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:20 AM2022-08-20T11:20:57+5:302022-08-20T11:21:19+5:30
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील एक सीन ट्वीट केला आहे.
BJP trolls Nitish Kumar Bihar Politics: बिहारमध्ये गेली काही वर्षे भाजपा आणि नितीश कुमार यांचे युतीचे सरकार होते. पण काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर भाजपाकडून नितीश कुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जेडीयू आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. भाजपाने नितीश सरकारच्या मंत्रिमंडळावर प्रश्न उपस्थित करत एक त्यांना ट्रोल केले आहे. बिहार भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत निशाणा साधला आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘इन्कलाब’ नावाच एक चित्रपट होता. या चित्रपटातील एक सीनचा व्हिडीओ बिहार भाजपाने शेअर केला आहे. याच व्हिडीओच्या आधारावर भाजपाने नितीश सरकारवर निशाणा साधला आहे. शेअर केलेल्या फिल्म व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन सरकारच्या मंत्रिमंडळाची ओळख करून देत आहेत. हा व्हिडिओ २ मिनिटे १८ सेकंदाचा आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी ज्या कलंकित मंत्र्यांची ओळख करून दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आरोप आहेत. धान्यात भेसळ करणाऱ्याला अन्नमंत्री, निरक्षरांना लुबडणाऱ्याला शिक्षणमंत्री, बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्याला अर्थमंत्री तर गुंडगिरी करणाऱ्याला कायदेमंत्री केल्याचे दिसत आहे. असा व्हिडीओ शेअर करून बिहार भाजपाने कॅप्शन देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "बिहार मंत्रिमंडळाचा सोप्या शब्दात संक्षिप्त परिचय. घाबरण्याची गरज नाही, या सरकारने आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे", असा टोमणा मारत नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाला ट्रोल करण्यात आले आहे.
बिहार मंत्रिमंडल का सरल शब्दों में संक्षिप्त परिचय।
— BJP Bihar (@BJP4Bihar) August 19, 2022
घबराने की बात नहीं है, इस सरकार ने अपनी-अपनी विधा में विशारद लोगों को उनकी योग्यतानुसार ही मंत्रीपद की जिम्मेदारी दी है। pic.twitter.com/Zh8ICLhiPh
बिहार भाजपाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. मात्र काँग्रेसच्या एका समर्थकाने लिहिले आहे की, अमिताभ जी इथे अर्थ मंत्रालयाचा संदर्भ घेत आहेत आणि नोटा छापण्याबद्दल बोलत आहेत. नोटा छापण्याचे काम हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. आता केंद्रात कोणाचे सरकार आहे?" तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, भाजपने उत्तर प्रदेशातील आपले सरकार पाहावे, त्यात किती कलंकित नेते आहेत. हे भाजपालाही लागू होते, भाजपाने हे विसरू नये, अशीही एक कमेंट करण्यात आली आहे.