भाजपा-टीआरएस जवळीक वाढली, निवडणुकीनंतर एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 12:35 PM2018-08-06T12:35:34+5:302018-08-06T12:35:40+5:30
तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच.
नवी दिल्ली- तेलुगू देसमने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाला भारतीय जनता पार्टीइतकाच जोरदार विरोध करताना तेलंगण राष्ट्र समिती पक्ष सर्वांनी पाहिला. त्याचवेळेस तेलगू देसमचा प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यातही हा पक्ष आघाडीवर होता. आता 2019 साली होत असलेल्य़ा लोकसभा निवडणुकांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली आहे.
दुसऱ्या भेटीमध्ये राव यांनी पंतप्रधानांशी तेलंगणसंदर्भातील विविध 11 मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. तेलंगण सरकारचे नवे सचिवालय बांधण्यासाठी सिकंदराबाद येथील बायसन पोलो ग्राऊंड आणि जिमखाना मैदान येथील संरक्षण खात्याची जमिन देण्यात यावी यासाठी राव प्रयत्नशील आहेत. कालेश्वरम प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणीही त्यांनी केल्याचे समजते.
तेलंगणमधील मागास जिल्ह्यांना मदत मिळावी तसे करिमनगर येथए आयआयटीची स्थापना करण्यासाठीही त्यांनी मागणी केल्याचे समजते. तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच. त्यातही तेलंगण राष्ट्र समिती तेलगू देसमला विरोध करण्यासाठी टीआरएसची भाजपाला मदत होणार आहे.