चौफेर टीकेने भाजप अस्वस्थ
By admin | Published: February 15, 2017 05:34 PM2017-02-15T17:34:24+5:302017-02-15T17:34:24+5:30
जाहीर प्रचाराची राळ : पाणी, वीज प्रश्नाला प्राधान्य
नाशिक : महापालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षापेक्षा सत्तेतील वाटेकरी व मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच अनेक प्रश्नांवर चौफेर टीका करण्याची भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून, विशेष करून गंगापूर धरणातून मराठवाड्याला सोडण्यात आलेले पाणी, विदर्भाच्या तुलनेत विजेच्या दरात असलेली वाढ, जाचक बांधकाम नियमावली अशा प्रश्नांना जाहीर सभांमधून उजागर करीत भाजपाला कोंडीत पकडले आहे.
प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम, पक्ष प्रवक्ते नीलम गोऱ्हे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाचारण करून भाजपाच्या विरुद्ध राळ उठविली आहे. नाशिक शहराच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाच्या विषयांना जाहीर सभांच्या माध्यमातून हात घालून भाजपाने नाशिककरांवर किती अन्याय चालविला याचा पाढाच वाचला जात आहे. विशेष करून गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडणे, उत्तर महाराष्ट्रापेक्षा विदर्भाला वीज दरात सवलत देणे, वन खात्याचे प्रशिक्षण केंद्र नाशिकहून नागपूरला पळविणे, एकलहरा वीज केंद्राचे स्थलांतराचे प्रयत्न करणे, एम्स या संस्थेसाठी नाशिकच्या तोंडाला पाने पुसणे, अडीच वर्षांनंतरही नाशिकची शहर विकास नियंत्रण नियमावली जाहीर न करणे, सात व नऊ मीटरच्या रस्त्यांवर बांधकाम चटई क्षेत्राला मज्जाव करणे, गुन्हेगार, गुंडांना पक्ष प्रवेश देणे या स्थानिक मुद्द्यासह नोटाबंदीच्या विषयावरूनही भाजपावर टीका केली जात आहे.