तेलंगणाने साधलेल्या विकासाने भाजप अस्वस्थ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:40 AM2023-03-14T07:40:15+5:302023-03-14T07:41:04+5:30
भाजप देत असलेल्या त्रासाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा निर्धार के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला.
हैदराबाद :तेलंगणा दरडोई उत्पन्नाबाबत देशात अग्रस्थानी आहे. त्यासाठी आम्ही अनेक अडथळ्यांवर मात केली आहे. वीजकपात न करता तेलंगणाने विकास साधला तसेच सामाजिक कल्याण व प्रगतीबाबत देशात पहिले स्थान पटकावले. तेलंगणाला मिळालेले यश पाहून भाजप अस्वस्थ झाला आहे, अशी टीका भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली.
ते म्हणाले की, तेलंगणाचा झालेला विकास भाजपला आवडलेला नाही. त्यामुळेच भारत राष्ट्र समितीच्या लोकप्रतिनिधींविरोधात भाजप षडयंत्र रचून त्यांना त्रास देत आहे. सीबीआय, ईडी, आयकर खात्याकडून लोकप्रतिनिधींवर धाडी टाकल्या जात असून, भाजपच्या अस्वस्थतेचे ते निदर्शक आहे. भाजप देत असलेल्या त्रासाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा निर्धार के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा भवनमध्ये झालेल्या एका बैठकीत व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
गुंतवणूकदारांनी दिले प्राधान्य
तेलंगणामध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सतत सुरू आहे. या राज्याच्या औद्योगिक धोरणाचे जगातील अनेक देशांनी कौतुक केले आहे. जगद्विख्यात कंपन्या हैदराबादमध्ये गुंतवणूक करण्यात आघाडीवर आहेत.
असा केला तेलंगणाने विकास
तेलंगणाने लहान मुले, मुली, वृद्ध व्यक्ती, शेतकरी यांच्या कल्याणासाठी उत्तम योजना राबविल्या आहेत. आयटीपासून विविध क्षेत्रांतील उद्योगांच्या विकासासाठी भारत राष्ट्र समितीच्या सरकारने ठोस पावले उचलली. त्यामुळे या उद्योगांचा विकास झाला आहे. या राज्यातील जलसंधारण क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी काही योजना राबविण्यात आल्या. त्याची चांगली फळे आता सर्वांना मिळत आहेत.
आंबेडकरांच्या पुतळ्याचे १४ एप्रिलला अनावरण
हैदराबादमधील हुसैन सागर तलावाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. त्या पुतळ्याचे अनावरण येत्या १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे. भारत राष्ट्र समितीच्या सरकारने हा पुतळा उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"