अकबरुद्दीन ओवैसींना शह देणार 'भाजपाच्या शहजादी'; चंद्रयानगुट्टा जिंकण्यासाठी 'मुस्लिम कार्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:55 PM2018-11-02T21:55:05+5:302018-11-02T21:56:06+5:30
तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपनेही दक्षिणेत कमळ फुलवण्याची जोरदारी तयारी केली आहे.
तेलंगणा - भाजपानेतेलंगणातीलविधानसभा निवडणुकांसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपाने पहिल्या यादीत 38 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर, भाजपाकडून आज दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली. त्यामध्ये दोन मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या संसदीय समितीतील तेलंगणाचे प्रभारी आणि मंत्री एन. इंद्रसेना रेड्डी यांनी ही यादी जाहीर केली. विशेष म्हणजे या यादीत अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविरुद्ध भाजपाने महिला मुस्लीम चेहरा दिला आहे.
तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपनेही दक्षिणेत कमळ फुलवण्याची जोरदारी तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपाने तेलंगणासाठी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत भाजपाने घोशामहल मतदारसंघात हिंदुत्ववादी चेहरा समोर केला. हिंदुत्ववादी आणि मराठी मतांचा विचार करत भाजपाने हैदराबादच्या प्रतिष्ठित घोशामहल विधानसभा मतदारसंघातून टायगर राजासिंग यांना उमेदवारी दिली. तर दुसऱ्या यादीत भाजपाने दोन मुस्लीम चेहरे मैदानात उतरवले आहेत. चंद्रयानगुट्टा या मतदारसंघातून भाजपाने सईद शहजादी यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून असुदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन औवेसी यांची एमआयएमकडून उमेदवारी आहे. तर बहादुरपुरा या मतदारसंघातून भाजपाने हनीफ अली यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाने तेलंगणाता जातीय अन् धार्मिक समीकरणे जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
अकबरुद्दीन ओवैसींना टक्कर
चंद्रयानगुट्टा हा अकबरुद्दीन औवेसींचा मतदारसंघ असून गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अकबरुद्दीन यांनी 80,393 मते घेतली होती. या जागेवर मजलीस बचाओ तेहरीक पक्षाच्या डॉ. खयाम खान यांना 21,119 मते मिळाली होती. खयाम खान हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते घेणारे उमेदवार ठरले होते. तर, भाजपाने गतवर्षी येथून आपला उमेदवार उभारलाच नव्हता. त्यामुळे अकबरुद्दीन यांना भाजापाकडून शहजादी यांची टक्कर असणार आहे.
कोण आहेत सईद शहजादी
सईद शहजादी या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्या असून अदिलाबादच्या येथील रहिवासी आहेत. राज्यशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. तेलंगणा भाजपातील मुस्लीम चेहरा म्हणून शहजादी यांच्याकडे पाहिले जाते. शहजादी यांचे वक्तृत्वार चांगली पकड असून सरकारी योजना आणि प्रशासनाचाही त्यांचा अभ्यास चांगला आहे. यापूर्वी अकबरुद्दीन यांनी हिंदू देव देवतांचा अपमान केला होता, त्यावेळी शहजादी यांनी अकबरुद्दीन यांचा निषेध केला होता.
भाजपा कार्यकर्ते नाराज
भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दुसऱ्या यादीत आपले नाव न आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका केली. तसेच भाजपा कार्यालयात तोडफोडही करण्यात आली आहे. माजी आमदार येंडला लक्ष्मीनारायण आणि नारायण गुप्ता हे दोघेही निजामाबाद ग्रामीण मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवू इच्छित होते. पण, भाजपाने लक्ष्मीनारायण यांना तिकीट दिल्यामुळे गुप्ता यांचे समर्थक नाराज झाले आहेत. तर, गुप्ता यांच्या समर्थकांनी निजामाबाद भाजापा कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. तर हैदराबादच्या शेरिलिंगमपल्ली येथून इच्छुक असलेले पक्षाचे प्रवक्ते नरेश यांनीही पक्ष कार्यालयासमोर तिकीट मागणी करत आंदोलन उभारले आहे.