गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:23 AM2022-02-07T11:23:34+5:302022-02-07T11:30:32+5:30

उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली.

BJP use the picture of Parrikar on the poster in goa Assembly election 2022, Voters are confused | गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

Next

राजेश निस्ताने - 

पणजी : गेली पाच वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे राजकारण स्थानिक सामान्य मतदारांना समजेनासे झाले आहे. एकीकडे भाजपने माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पोस्टर-बॅनर्सवर सर्रास मनोहर पर्रीकरांचे छायाचित्र वापरले जात आहे. 

उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उत्पल हे अपक्ष रिंगणात आहेत. बऱ्याच शहरी भाजप समर्थकांची त्यांना छुपी साथही लाभते आहे. उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप असा सामना या मतदारसंघात होण्याची चिन्हे आहेत. त्यावर गोव्यात भाजपला मनोहर पर्रीकर चालतात; परंतु त्यांचा मुलगा पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून का चालत नाही, असा सवाल सामान्य मतदारांमधून विचारला जातो आहे. 

उत्पलला शर्यतीबाहेर दाखविण्याचा प्रयत्न
भाजपकडून उत्पल हे जणू रिंगणातच नाही असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. पणजी मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असल्याचे बाबूश यांनी सांगून जणू उत्पल यांना बेदखल केले आहे.

देवेंद्र फडणवीसांवर नाराजी
टॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार व काही सामान्य मतदारांशी चर्चा केली असता भाजपने उत्पल पर्रीकरांचे तिकीट कापणे अनेकांना रुचलेले नसल्याचे जाणवले. गोवा भाजपचे केंद्रीय निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी ‘नेत्याचा मुलगा हा तिकिटासाठीचा निकष होऊ शकत नाही’ असे सांगून उत्पल पर्रीकर यांचे तिकीट कापल्याने मतदारांमध्ये फडणवीसांबाबत नाराजी आहे.

गोव्यात शिवसेनेपुढे खाते उघडण्याचे आव्हान 
 महाराष्ट्रात गावखेड्यापर्यंत कार्यकर्ते आणि सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला गेली २७ वर्षे प्रयत्न करूनही गोवा विधानसभेत खातेही उघडता आलेले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून सेनेला एखादा तरी आमदार निवडून आणता येतो का, याकडे गोव्यासह महाराष्ट्राचेही लक्ष लागले आहे. गोवा हे मराठी भाषिकांचेही राज्य आहे. विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. 

 

Web Title: BJP use the picture of Parrikar on the poster in goa Assembly election 2022, Voters are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.