भाजपचा 'आनंदी' शेतकरी करतोय आंदोलन; आता भाजपलाच नोटीस पाठवणार

By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 08:54 AM2020-12-23T08:54:55+5:302020-12-23T08:57:41+5:30

पंजाबमधील हरप्रीत सिंग गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर करताहेत आंदोलन

bjp uses punjab farmer harpreet singh as its poster boy in ad who is protesting on singhu border | भाजपचा 'आनंदी' शेतकरी करतोय आंदोलन; आता भाजपलाच नोटीस पाठवणार

भाजपचा 'आनंदी' शेतकरी करतोय आंदोलन; आता भाजपलाच नोटीस पाठवणार

Next

नवी दिल्ली: मोदी सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र नवे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच असल्याच्या भूमिकेवर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. भाजपकडून पंजाबमध्ये नव्या कायद्यांसंदर्भात जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हरप्रीत सिंग नावाच्या एका शेतकऱ्याचा फोटो वापरण्यात आला आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे हरप्रीत सिंग आनंदी असल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. मात्र हेच हरप्रीत सिंग गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवर नव्या कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.

हरप्रीत सिंग यांचा फोटो भाजपनं जाहिरातींमध्ये वापरला आहे. या जाहिरातीत नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदे होत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र भाजपनं आपला फोटो कोणत्याही परवानगीविना वापरला असल्याचा आक्षेप हरप्रीत यांनी नोंदवला. भाजपनं बेकायदेशीरपणे फोटो वापरल्याचा आरोप त्यांनी केला. हरप्रीत पंजाबच्या होशियारपूरचे रहिवासी असून ते शेतकरी आहेत. मात्र शेतीसोबतच ते अभिनयदेखील करतात.



भाजपनं संमतीशिवाय जाहिरातीत फोटो वापरल्यानं हरप्रीत यांनी नापसंती व्यक्ती केली. 'मी ६-७ वर्षांपूर्वी माझा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हाच फोटो भाजपनं जाहिरातीत वापरल्याचं मला काल काही मित्रांकडून समजलं. त्यांनी मला जाहिरातीचे फोटोदेखील पाठवले. मात्र माझा फोटो वापरण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आता लोक मला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणत आहेत. पण मी भाजपचा पोस्टर बॉय नसून शेतकऱ्यांचा पोस्टर बॉय आहे,' असं हरप्रीत म्हणाले.

हरप्रीत गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलन करत आहेत. हरप्रीत आता भाजपच्या जाहिरातीसह स्वत:चा ओरिजनल फोटो भाजपला पाठवणार आहेत. यासोबत कायदेशीर नोटीसदेखील बजावण्यात येईल. भाजपनं हरप्रीत यांच्या फोटोसह नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगणाऱ्या जाहिराती तयार केल्या आहेत. जाहिरातीत हरप्रीत नांगर हाती घेऊन उभे आहेत. त्यांच्या शेजारी हमीभावाबद्दलच्या शंका दूर करणारा तपशील देण्यात आला आहे.
 

Web Title: bjp uses punjab farmer harpreet singh as its poster boy in ad who is protesting on singhu border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा