समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:12 AM2021-02-11T05:12:26+5:302021-02-11T05:12:47+5:30
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत.
रायगंज (पश्चिम बंगाल) : आपण देवच आहोत, अशा थाटात भाजप नेते रथांतून फिरत आहेत, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांच्या रथयात्रेची खिल्ली उडविली. धर्माच्या आधारे समाजात दुही निर्माण करणे, हा त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे, असा आरोपही त्यांनी केला.
रायगंज येथील सभेेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत. आपण देवच आहोत, अशा आविर्भावात भाजप नेते रथयात्रा काढत आहेत.
प. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप राज्याबाहेरील लोकांना आणत आहे, या आरोपाचाही ममता बॅनर्जी यांनी पुनरुच्चार केला.
भाजपचे नेते फक्त फोटो काढण्यासाठी स्थानिक लोकांच्या घरी भोजन करीत आहेत. काही बाहेरचे लोक अलीशान कारमधून येत आहेत. फोटो काढण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या घरी भोजन करतात. प्रत्यक्षात हे भोजन पंचतारांकित हॉटेलातील असते, असा आरोपही त्यांनी केला.
गुजरातमधून आलेले लोक नव्हे,तर, प. बंगालवर राज्यांतील लोकच राज्य करतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.