Usha Thakur : "टंट्या मामाचं ताबीज करणार रक्षण, कोणताही आजार होईल बरा"; कोरोनात भाजपा मंत्र्यांचं अजब विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 10:17 PM2021-12-02T22:17:59+5:302021-12-02T22:28:14+5:30
BJP Usha Thakur : सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,765 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 477 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा, कोरोना नियमावलीचं पालन करण्याचा सल्ला आवर्जून दिला जात आहे. याच दरम्यान सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे. सध्या ठाकूर यांच्या विधानाचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
"टंट्या मामाचं ताबीज आपलं संरक्षण करेल. कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे कोणालाही काहीही होणार नाही, कोणताही आजार असेल तर तो देखील बरा होईल" असं विधान आता उषा ठाकूर यांनी केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये टंट्या मामा भिल यांचा बलिदान दिवस दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आदिवासी समाजातील लाखो बांधव यावेळी एकत्र येत असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी आस्थेचं स्थान असलेल्या या उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान उषा ठाकूर यांनी हे विधान केलं आहे.
"मी हनुमान चालीसाचे पठण करते, हवन करते... हा माझा कोरोनापासून बचाव"
उषा ठाकूर यांनी याआधी देखील कोरोनाबाबत वादग्रस्त विधान केलेली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी "मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा कोरोनापासून बचाव आहे" असं म्हटलं आहे. तसेच मी गळ्यात गमछा ठेवते, जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याला कुठला आजार स्पर्शही करू शकत नाही" असं ठाकूर यांनी म्हटलं होतं.
"...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"
शिवराज सरकारमधील मंत्री आणि मध्य प्रदेशच्या महूच्या आमदार उषा ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. याआधी उषा ठाकूर यांनी संपूर्ण जगाला भगवं करण्याचं एक अजब सूत्र सांगितलं होतं. "सद्यस्थितीतील वाढते धोके पाहता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे-अस्त्रे ठेवली पाहिजेत" असं ठाकूर यांनी म्हटलं होतं. तसेच "भगवा हा शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे जर संपूर्ण जग भगवं झालं तर सगळीकडे आनंदाचं आणि शांततेचं वातावरण असेल" असंही म्हटलं होतं. भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना ठाकूर यांनी वादग्रस्त विधानं केलं होतं.