तेलंगणात भाजपाच जिंकणार, स्वामी परिपूर्णानंदांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:40 PM2018-10-26T15:40:17+5:302018-10-26T18:32:23+5:30
भाजपा देश आणि धर्माचं रक्षण करणारा पक्ष आहे. तसेच देशातील जातीव्यवस्था आणि कौटुंबीक वंशपरंपराही भाजपाच दूर करू शकते.
हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुदतपूर्व विधानसभा बरखास्त केल्यामुळे तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीतही टीआरएस आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, दक्षिण भारतात कमळ फुलवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यातच, श्रीपीठमचे पीठाधिपती स्वामी परिपूर्णानंद यांनी तेलंगणात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी भविष्यवाणी करत तेलंगणात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असे म्हटले आहे.
भाजपा देश आणि धर्माचं रक्षण करणारा पक्ष आहे. तसेच देशातील जातीव्यवस्था आणि कौटुंबीक वंशपरंपराही भाजपाच दूर करू शकते. तेलंगणा भाजपाचे अध्यक्ष के. लक्ष्मण यांच्या नेतृत्वात मिशन 70 साठी भाजपा उत्कृष्ट कार्य करत आहे. त्यामुळे, तेलंगणात भाजपाचे सरकार येण्यास कुणीही रोखू शकत नाही, असे स्वामी परिपूर्णानंद यांनी म्हटले आहे. नुकतेच अमित शहांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच प्रदेश भाजपाच्या कार्यालयाला स्वामी परिपूर्णानंद यांनी भेट दिली. त्यावेळी, स्वामींना भाजपाच विजयी होणार असल्याची भविष्यवाणी केली. तसेच मला कुठल्याही पदाची अपेक्षा नसून मी केवळ पक्षासाठी काम करत असल्याचेही स्वामींनी म्हटले.
पहिल्याच प्रचार टप्प्यात मोदींची हजेरी
तेलंगणात भाजपाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून लवकच उर्वरीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांच्या नेतृत्वात भाजपाने तेलंगणात मिशन 70 चे गणित आखले आहे. त्यासाठी, पहिल्याच प्रचारमोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात हजेरी लावणार आहेत. त्यावेळी, हैदराबाद, निजामाबाद आणि सूर्यापेट येथील निवडणूक प्रचार सभांमध्ये मोदी जनतेला संबोधित करतील, असे के. लक्ष्मण यांनी सांगितले आहे.