'मुझे चलते जाना है...' भाजपने व्हिडीओद्वारे दाखवली 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्लॅनची झलक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 02:58 PM2023-03-16T14:58:56+5:302023-03-16T15:06:30+5:30
या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने आपल्या प्लॅनची झलकही दाखवली आहे.
नवी दिल्ली : मिशन 2024 साठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपला प्लॅन अॅनिमेटेड व्हिडिओद्वारे सांगितला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने आपल्या प्लॅनची झलकही दाखवली आहे. 'मुझे चलते जाना है...', असे व्हिडिओचे शीर्षक आहे.
साडेचार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांची झलक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसे टार्गेट केले, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच, 2014 आणि 2019 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास कसा होता, हेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
मुझे चलते जाना है... pic.twitter.com/1NLvbV7L8y
— BJP (@BJP4India) March 14, 2023
व्हिडिओच्या सुरुवातीला पीएम नरेंद्र मोदी पायऱ्या चढताना दिसत आहेत. 2007 च्या सुरुवातीला गुजरात CM लिहिले आहे. यानंतर नरेंद्र मोदी समोरच्या पायऱ्या चढतात. नरेंद्र मोदी पायऱ्या चढत असताना सोनिया गांधी दिसतात. सोनिया गांधी एका यमराजाकडे इशारा करतात. ज्या म्हशीवर यमराज बसले आहेत, तिच्यावर मृत्यूचा व्यापारी असे लिहिले आहे. तसेच, मणिशंकर अय्यर सोनिया गांधींसोबत चहाची किटली धरताना दिसत आहेत. ते 'चाय-चाय' म्हणत हसताना दिसत आहेत, पण मोदी किटली हातात घेतात आणि हसत निघून जातात.
व्हिडिओमध्ये काँग्रेस नेत्यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी आणखी प्रयत्न केले आहेत, परंतु नरेंद्र मोदी पुढे सरकले आणि 2014 मध्ये पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले. यानंतरही नरेंद्र मोदी पायऱ्या चढून सरकारच्या योजनांची माहिती दाखवतात. तसेच, व्हिडिओच्या शेवटी 5 ट्रिलियन इकॉनॉमी लिहिल्याचे दिसत आहे.