अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:16 IST2025-02-08T12:16:27+5:302025-02-08T12:16:56+5:30
BJP vs AAP Delhi Election Results 2025 News: काही दिवसांपूर्वीच हजारेंनी केजरीवालांना स्वार्थी म्हटले होते. अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता.

अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...
गेल्या दोन विधानसभा एकहाती सत्ता मिळविणाऱ्या आपला चौथ्या निवडणुकीत दिल्लीकरांनी खाली खेचले आहे. अद्याप निकाल हाती आलेले नसले तरी भाजपा ४५, आप २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा तर सुफडा साफ झाला आहे. वेगवेगळे लढण्याची खुमखुमी काँग्रेस आणि आपला नडली असली तरी केजरीवालांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारे (Anna Hazare) यांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.
दिल्ली निकालावर (Delhi Election Results) अण्णा हजारे यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याने बुडविले, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हजारेंनी केजरीवालांना स्वार्थी म्हटले होते. अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे हजारे म्हणाले होते.
आजच्या आपच्या दिल्ली पराभवावर हजारेंनी म्हटले की, मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे की निवडणूक लढवताना उमेदवाराचे चारित्र्य, चांगले विचार आणि प्रतिमेवर कोणताही डाग नसावा. पण, त्यांना (आप) ते समजले नाही. ते दारू आणि पैशात अडकले, त्यामुळे त्यांची (अरविंद केजरीवाल) प्रतिमा खराब झाली आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीत कमी मते मिळत आहेत, असे मत हजारे यांनी व्यक्त केले.
तसेच लोकांनी पाहिले की केजरीवाल चारित्र्याबद्दल बोलतात पण दारूमध्ये वाहत गेले. कारण त्यात पैसा आला. राजकारणात आरोप केले जातात. पण दोषी नाही हे सिद्ध करावे लागते. सत्य सत्यच राहील. जेव्हा पहिली बैठक झाली तेव्हा मी ठरवले की मी पक्षाचा भाग राहणार नाही आणि मी त्या दिवसापासून दूर राहिलो, असे हजारे यांनी सांगितले.