West Bengal: भाजपमधील कलह वाढला! दिलीप घोष यांना कार्यकर्त्यांनी घेरले; बैठकीत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 11:45 AM2021-06-05T11:45:19+5:302021-06-05T11:46:03+5:30
West Bengal: भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.
हुगली:पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर आता भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात निदर्शने केली. (bjp west bengal chief dilip ghosh faced protest of party workers)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हुगली येथील चुचुरा भागात बुथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालत निदर्शने केली. हुगली जिल्हा समिती बरखास्त करावी आणि जिल्हाध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.
गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा
पक्षाच्या शिस्तीबाबत तडजोड नाही
या विरोध प्रदर्शनाबाबत बोलताना हुगली येथून खासदार असलेले लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नेते तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोध तक्रारही करण्याला विरोध नाही. त्यासाठी कार्यकर्ते स्वतंत्र आहेत. मात्र, पक्षाचे काही नियम आहेत. पक्षाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले. तसेच यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा दावा केला.
तृणमूल काँग्रेसवर केले आरोप
तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सामीन होऊन गोंधळ घालायला सुरुवात केली, असा दावा लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आला असून, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. लॉकेट चॅटर्जी आणि दिलीप घोष यांनी आधी पक्ष सांभाळावा आणि मगच इतरांना सल्ले द्यावेत, असा पलटवार तृणमूल काँग्रेस हुगलीच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होते. मात्र तृणमूलने तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हे आहेत. भाजपचे ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठे भगदाड पडू शकते, असे सांगितले जात आहे.