भाजप त्रिपुरात सत्तेत येईल- शहा
By admin | Published: May 7, 2017 01:05 AM2017-05-07T01:05:45+5:302017-05-07T01:05:45+5:30
आपला पक्ष त्रिपुरातील प्रदीर्घ मार्क्सवादी कुशासनाचा एकमेव पर्याय असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरतळा : आपला पक्ष त्रिपुरातील प्रदीर्घ मार्क्सवादी कुशासनाचा एकमेव पर्याय असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे म्हटले. आपला पक्ष त्रिपुरात स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, महिलांना अजिबात सुरक्षित वाटत नाही. त्यांनी इतर बिगर डाव्या पक्षांशी युतीची शक्यता फेटाळली नाही; मात्र पक्षाचा भर स्वत:चा जनाधार बळकट करण्यावर असल्याचे स्पष्ट केले.
शहा परिवर्तन यात्रेसाठी दोन दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत. राज्याची लोकसंख्या ३७ लाख आहे. येथील ६५ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगत असून, २५ टक्के लोकांना पेयजलही उपलब्ध नाही, असा दावा त्यांनी केला.
मार्क्सवादी हिंसाचार आणि सुडाची भावना राज्यात भाजपचा उदय रोखू शकत नाही. सत्ताधारी पक्षाने दहशत निर्माण करणे सुरू ठेवले तर भाजपला आणखी बळकटी मिळेल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
भाजप चिटफंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार का, असा प्रश्न विचारला असता शहा म्हणाले की, कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, असे म्हणावे लागण्याचे कारण नाही. यात गरीब लोकांची लूट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माणिक सरकार स्वत: नैतिक आधारे सीबीआय चौकशी करण्यास सांगू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. भाजपच त्रिपुरात पुढील सरकार बनवेल. ही लढाई कठीण असणार नाही. कारण, कम्युनिस्ट संपूर्ण जगात क्षीण झाले आहेत, तर काँग्रेस आता छोटा पक्ष बनला आहे, असेही ते म्हणाले.