राजनाथसिंह असतील भाजपाचा यूपीतील चेहरा...
By admin | Published: January 6, 2017 03:13 AM2017-01-06T03:13:01+5:302017-01-06T03:13:01+5:30
गेल्या अनेक महिन्याच्या द्विधा स्थितीनंतर भाजपने अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा म्हणून उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
हरिष गुप्ता, नवी दिल्ली
गेल्या अनेक महिन्याच्या द्विधा स्थितीनंतर भाजपने अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा म्हणून उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मे २०१४ पासून आजवरच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हेच एकमेव भाजपचे मुख्य प्रचारक असत. या धोरणाला फाटा देता भाजप नेतृत्वावाने राजनाथ सिंह यांच्यावर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
सर्व फलक, व्हिडियो व प्रचाराच्या साहित्यावर राजनाथ सिह यांच्यासह मोदी व अमित शाह यांचे छायाचित्र असेल. भाजपच्या प्रचाराशी संबंधित उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रचार साहित्यावर तीनही नेत्यांची सारख्याच आकाराची छायाचित्रे असतील. तथापि, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून राजनाथ सिंह यांना प्रतित केले जाणार नाही.
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपणांस पुढे करावे, अशी राजनाथ यांचीही इच्छा नाही. मध्यंतरी राजनाथ यांनी उत्तर प्रदेशात जाण्याची तयारी दाखविली होती; परंतु, भाजप नेतृत्वही त्यांना सोडण्यास तयार नव्हते. तथापि, उत्तर प्रदेशातील राजकीय स्थिती बदलली असून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लोकप्रियता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांत अनेकदा झालेल्या चर्चेअंती, असे ठरले की उत्तर प्रदेशात भाजपाला सत्ता मिळवायची असेल तर राजनाथ सिंह यांना प्रचार मोहिमेत प्राधान्य द्यावे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पुढारी आहेत यात शंका नाही आणि त्यांची प्रतिमाही अभंग आहे. निवडणुकीत यश मिळाले तर मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाईल याबद्दल मतदारांत कोणतीही संदिग्धता राहू नये, असे स्थानिक नेतृत्वाला वाटते.