निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 10:20 AM2019-05-21T10:20:17+5:302019-05-21T10:34:12+5:30
एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे.
भुवनेश्वर - लोकसभा निवडणुकीबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनंतर भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालीली एनडीएच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधी पक्ष संभाव्य जागांच्या आकडेमोडीत गुंतले आहेत. दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या बिजू जनता दलाने निकालांनंतर एनडीएसोबत येण्याचे संकेत दिले आहे. जो पक्ष ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्यापक्षासोबत आम्ही जाऊ, असे बीजू जनता दलाकडून सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी ओदिशामध्ये आलेल्या फोनी चक्रीवादळावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहणी दौरा केला होता. त्यावेळी नवीन पटनाईक यांच्यासोबत मोदींनी वादळाने प्रभावीत झालेल्या भागाची पाहणी केली होती. तसेच नवीन पटनाईक यांच्याविरोधातील टीकाही कमी केली होती. त्याबरोबरच मोदींनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वादळामुळे प्रभावित झालेल्यांसाठी नवीन पटनाईक यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच एनडीएचे बहुमत हुकल्यास बिजू जनता दल भाजपाला पाठिंबा देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, जी आघाडी आमच्या समस्या समजून घेईल, योग्य मागण्या पूर्ण करेल त्या आघाडीला आम्ही पाठिंबा देऊ. जर एनडीए सरकार स्थापन झाले तर त्यांनाही आम्ही पाठिंबा देऊ, असे बिजू जनता दलाचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनाईक यांनी म्हटले आहे. तसेच जी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल, त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ, असेही अमर पटनाईक यांनी स्पष्ट केले.
Amar Patnaik, BJD: We would probably support some party or some kind of combination, whoever forms the govt at the Centre and agrees to settle some of the unsettled and long pending issues of Odisha. pic.twitter.com/YmqJaogvY4
— ANI (@ANI) May 20, 2019
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल प्रसिद्ध केले होते. वाजता संपल्यानंतर, देशभरातील राजकीय वर्तुळात ज्याची प्रचंड उत्सुकता होती, ते एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि एजन्सींनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून आणि तज्ज्ञांची मतं घेऊन जनतेचा कौल कुणाला, याचा अंदाज बांधला आहे. स्वाभाविकच, प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. परंतु, देशात 'फिर एक बार, मोदी सरकार' येईल, असंच बहुतांश एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. एनडीए 300 जागांपर्यंत मजल मारू शकेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलनी भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे म्हटले आहे.
दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज फेटाळून लावले आहेत.