भाजपा देणार एक लाख गायी! भाजपातर्फे आश्वासनांची खैरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:37 AM2018-11-22T05:37:11+5:302018-11-22T05:37:55+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.
- धनाजी कांबळे
हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.
शेती, आरोग्य आणि ग्रामीण भागातील अर्थकारण गायीवर अवलंबून असते. भाजपा एक वेब पोर्टल तयार करणार असून, ज्यांना गाय हवी आहे, त्यांनी यावर नोंदणी केल्यास त्यांना गाय दिली जाईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी साधारण ३ हजार गायी दिल्या जाणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस)ही २०१७ मध्ये अशी योजना आणली होती.
सत्तेवर आल्यास तीन महिन्यांच्या आत १ लाख बेरोजगार युवकांना रोजगार असेही आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या तिकीटांवर असलेला सरचार्ज हटवला जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. तसेच जुन्या बस आणि रिक्षा बंद केल्या जातील, त्या गाडीमालकांना प्रदूषणमुक्त वाहन देण्याचा प्रयत्न आहे, असेही भाजपाने म्हटले आहे.
योगा स्कूल व संस्कृत विद्यापीठ उभारू, असेही भाजपाचे आश्वासन आहे. आयटीमधील कर्मचाºयांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न भाजपा करणार आहे. योगा हे आरोग्याशी संबंधित आहे, असेही भाजपाने म्हटले आहे. जाहीरनाम्यात हैदराबादचा इतिहास, रझाकार, निजामाचे शासन आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा संघर्ष याचाही अकॅडमिक आढावा घेण्याचा भाजपाचा मानस आहे.
इंधन करणार स्वस्त
जनता महागाईने होरपळत आहे. विशेषत: पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीकडे सरकल्या असल्याने भाजपाविरोधात जनमानस आहे. असंतोष कमी करण्यासाठी तेलंगणामध्ये सत्तेत आल्यास पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करू, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असे आश्वासन भाजपा देत आहे. पेट्रोलवरील ३२ आणि डिझेलवरील २७ टक्के व्हॅट हटवला जाईल, असे भाजपाने म्हटले.