"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक", केजरीवालांचा भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:36 PM2023-03-04T20:36:49+5:302023-03-04T20:38:58+5:30
अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (4 मार्च 2023) कर्नाटकमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेत्याच्या मुलाला 8 कोटी रुपयांसह पकडण्यात आले. परंतु मनीष सिसोदिया यांना अटक केली, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
कर्नाटकमधील लोक खूप चांगले आहेत, देशभक्त आहेत. मात्र, येथील नेते खूप वाईट आहेत. कर्नाटक सरकार हे 40 टक्के कमिशन असलेले सरकार आहे. आज या नेत्यांमुळे कर्नाटक राज्याची बदनामी देशभरात आणि जगात झाली आहे. येथे होणाऱ्या कोणत्याही सरकारी कामात येथील नेत्यांना 40 टक्के कमिशन द्यावे लागते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच अमित शाह आले होते, त्यांनी मोठ-मोठ्या गोष्टी सांगितल्या. आमचे सरकार बनवा, आम्ही भ्रष्टाचार दूर करू, असे ते म्हणत होते. अमित शाह यांना कोणीतरी आठवण करून दिली की, सध्या तुमचेच सरकार आहे. पाच वर्षे तुम्ही काय करत होता? असा सवाल केला.
अमित शाह विमानाने परत जाताच दुसऱ्या दिवशी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचा एक मुलगा 8 कोटी रुपयांसह पकडला गेला, परंतु त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी भाजप त्याला पद्मभूषण पुरस्कार देऊ शकते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, उपहासात्मक टीका करत अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे.
याचबरोबर, मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काहीही सापडले नाही. मनीष सिसोदिया यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप भाजपचे लोक करतात. तसे असते तर त्यांच्या घरात थोडे तरी पैसे सापडले असते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.