उत्तर प्रदेशात महाआघाडी झाल्यास भाजपाची उडणार दाणादाण, सर्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 09:43 PM2018-11-29T21:43:16+5:302018-11-29T21:44:04+5:30
लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे.
नवी दिल्ली - लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांनंतर सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. मात्र या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे. सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.
टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सने आज लोकसभा निवडणूक झाली तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदारांचा काय कल असेल याचा सर्वे करून अंदाज घेतला आहे. या सर्वेमध्ये सपा, बसपा, काँग्रेस आणि रालोद या पक्षांची महाआघाडी झाल्यास त्याचा या पक्षांना स्पष्टपणे फायदा होईल, असे या सर्वेत म्हटले आहे. अशा स्थितीत महाआघाडीला 49 जागा मिळतील. तर भाजपाला 31 जागा मिळतील.
सपा बसपा यांची महाआघाडी झाल्यास भाजपाला 16 जागांचे नुकसान होऊन त्यांच्या जागा 55 पर्यंत खाली येतील, तर सपा आणि बसपाला प्रत्येकी नऊ आणि काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना दोन जागा मिळतील.
सपा, बसपा आणि रालोद यांच्या महाआघाडीत काँग्रेस सहभागी न झाल्यास भाजपाला 45 आणि महाआघाडीला 33 जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागेल.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी अद्यापही लोकप्रिय आहेत. मोदींना 42 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 20 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तसेच राफेल घोटाळा आणि राम मंदिरापेक्षा स्थानिक मुद्दे मतदारांना अधिक प्रभावी वाटतात. असेही सर्वेमधून समोर आले आहे.