अर्ज भरताना भाजप करणार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांसाठी असेल दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:43 AM2023-10-19T05:43:45+5:302023-10-19T05:44:36+5:30
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी कोणत्याही नेत्याचे नाव घोषित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांच्या उमेदवारांचा अर्ज भरतेवेळी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री व नेत्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांच्या नामांकनावेळी सहभागी होणार आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी कोणत्याही नेत्याचे नाव घोषित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वावरच निवडणूक लढविली जात आहे. परंतु एखाद्या नेत्याची उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी कोणते नेते जात आहेत, यावरून त्या राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांचे संकेत मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांची उमेदवारी दाखल करतेवेळी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजनांदगाव येथे जाणार आहेत.
वसुंधरा राजे यांना निवडणूक प्रचार मोहीम समितीचे अध्यक्ष करणार नाहीत. राजस्थानबाबत भाजपमध्ये वाद आताही वाढत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा आणि उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर तसेही निवडणूक प्रचार मोहीम समितीचे काम संपते. त्यामुळे आता सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप राजस्थानमध्ये आता कोणतीही निवडणूक प्रचार मोहीम समिती गठित करणार नाही. यापूर्वी या समितीचे अध्यक्ष करण्याची मागणी वसुंधरा राजे यांनी केली होती.
शाह आणि नड्डा यांची उपस्थिती
जोधपूर येथून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत निवडणूक लढवू शकतात. त्यांनी अर्ज दाखल करतेवेळी अमित शाह जातील.
खा. दिया कुमारी अर्ज दाखल करताना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा जाऊ शकतात.
येथे जाणार नितीन गडकरी, राजनाथ सिंह
nमध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या अनेक दावेदारांपैकी शिवराज सिंह चौहान हे बुधनी येथून व इंदूर - एकमधून कैलाश विजयवर्गीय उमेदवारी दाखल करताना अमित शाह उपस्थित राहू शकतात.
nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी २५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नरसिंहपूर येथे जातील.
nकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा दिमनी येथून उमेदवारी अर्ज दाखल करताना २४ किंवा २५ रोजी मुरैना येथे जातील.