'भाजपा गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 05:48 PM2019-10-26T17:48:48+5:302019-10-26T17:54:07+5:30
चंदिगडमधील युटी गेस्ट हाऊसमध्ये भाजपाच्या आमदारांची बैठक झाली.
चंदीगड : हरयाणा विधानसभेत भाजपाने बहुमत मिळवत जननायक जनता पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सिरसा मतदारसंघातून निवडून आलेले हरयाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाळ कांडा यांचे समर्थन भाजपाने नाकारले आहे.
हरयाणात भाजपाची सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद दाखल असून त्यांनी भाजपाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. यावेळी भाजपा हरयाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
चंदिगडमधील युटी गेस्ट हाऊसमध्ये भाजपाच्या आमदारांची बैठक झाली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मनोहर लाल खट्टर यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याशी चर्चा करून हरयाणात सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मनोहरलाल खट्टर उद्या दुपारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
आम्ही कांडाचा पाठिंबा घेत नाही - विज
हरयाणाचे मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल विज यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की, 'आम्ही गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेत नाही. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील करण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही.'
गोपाळ कांडांनी दिला होता बिनशर्त पाठिंबा
हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गोपाळ कांडा आणि इतर सहा अपक्ष आमदारांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी शुक्रवारी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गोपाळ कांडा यांच्यावर एअर होस्टेसला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेण्यावर विरोधकच नाही तर भाजपानेही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, सोशल मीडियावरील विरोध पाहता भाजपा गोपाळ कांडा यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे.
गोपाळ कांडा यांच्यावर आरोप
2012 मध्ये एअर होस्टेस गीतिका शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच, बलात्काराचा आरोप गोपाळ कांडा यांच्यावर ठेवण्यात आला होता. एक वर्ष तुरुंगात काढल्यानंतर गोपाळ कांडांची जामिनावर सुटका झाली. गोपाळ कांडा यांच्यावरील गंभीर आरोपामुळे देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली होती. गोपाळ कांडा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात भाजपाचाही सहभाग होता. त्याच गोपाळ कांडा यांचा हरयाणामध्ये सत्तेसाठी पाठिंबा घेण्याचे संकेत भाजपाने दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली होती.