वसुंधरा राजेंना नाराज करण्याचा धोका भाजप पत्करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:03 AM2023-10-11T09:03:42+5:302023-10-11T09:04:16+5:30
शिवराज सिंह चौहान व रमण सिंह यांना तिकीट दिल्यानंतर आता भाजप राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची मनधरणी करण्यात गुंतला आहे.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : कर्नाटकमधील पराभवानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्व जपून पावले उचलत आहे. निवडणुकीतील शक्यता पाहून आता केंद्रातील नेत्यांनी प्रदेशातील दिग्गज नेत्यांपुढे हात टेकले आहेत. शिवराज सिंह चौहान व रमण सिंह यांना तिकीट दिल्यानंतर आता भाजप राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची मनधरणी करण्यात गुंतला आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमधील जाहीर झालेली उमेदवारांची यादी पाहता भाजप आता कर्नाटकप्रमाणे कोणताही नवीन प्रयोग या पाच राज्यांच्या निवडणुकीत करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. नव्या चेहऱ्यांना तिकिटे दिलेली नसून, अर्ध्या आमदारांची तिकिटे कापणे, मंत्र्यांची तिकिटे कापणे, वयोवृद्ध नेत्यांना तिकिटे नाकारणे, असे काहीही झालेले नाही. ना शिवराज सिंह चौहान यांचे तिकीट कापण्यात आले, ना छत्तीसगढमध्ये रमणसिंह यांचे तिकीट कापण्यात आले.
२६ नावे घराणेशाहीतून
- ज्या घराणेशाहीचा आरोप भाजप काँग्रेसवर करीत होता, तेही आता विसरण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील २६ नावे घराणेशाहीतून आलेली आहेत.
- छत्तीसगढमध्ये रमण सिंह व त्यांचा पुतण्या विक्रांत सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. दिलीप सिंह यांचे पुत्र प्रबल प्रताप व जुदेव यांच्या सूनबाई या दोघांना भाजपने तिकीट देऊन मैदानात
उतरवले आहे.