दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा भाजपा जिंकणार - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:36 AM2018-09-24T03:36:52+5:302018-09-24T03:37:15+5:30
राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपाचेच उमेदवार विजयी होतील,असा दावा या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला.
- नितिन अग्रवाल
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपाचेच उमेदवार विजयी होतील,असा दावा या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. देशाच्या विकासामध्ये पूर्वांचलमधील बांधवांचा मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले. दिल्ली प्रदेश भाजपाने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी पूर्वांचलवर झालेल्या अन्यायाबाबत काँग्रेसला जबाबदार धरले.
दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात ‘पूर्वांचल महाकुंभ’मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘२०१४ पूर्वी जे जे सरकार आले, त्यामध्ये काँग्रेसचे सरकार ५५ वर्षे होते. पूर्वांचलवासीयांवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसनेच केला. भाजपा विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. विरोधी पक्षांचे धोरण केवळ नरेंद्र मोदी यांना हटविणे हे आहे. आम्ही मतांचे राजकारण करीत नाही. आमचा पक्ष देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो.’
पूर्वांचलच्या विकासाचे आश्वासन स्मरणात आणून देत शहा म्हणाले, ‘मोदी म्हणाले होते की भाजपाचे सरकार आले, तर पूर्वांचलचा विकास होईल. तो हिशेब मांडण्यासाठी मी आलो आहे. बिहार, झारखंड, ओडिशासारख्या राज्यांमध्ये झालेल्या विकासावरुन ती किती पुढे गेली आहेत ते दिसून येते. या सर्व राज्यांसाठी काँग्रेसच्या सरकारने केवळ ४ लाख कोटी रुपये दिले होते. पण आमच्या सरकारने केवळ साडेचार वर्षांमध्ये १३.८० लाख कोटी दिले. त्यातील ११ लाख कोटी खर्च झाले आहेत.’
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहा म्हणाले, ‘खोटे बोलणे हा त्यांचा एकमेव मंत्र आहे. राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमध्ये (एनआरसी) झालेल्या घुसखोरीवर अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मत स्पष्ट करावे.
दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या समस्या आजही जशाच्या तशा आहेत. ३ मुलींचा भूकबळी गेला, तरी ते तिकडे फिरकले नाहीत, असे ते म्हणाले. तिवारी यांनी ‘एनआरसी’ दिल्लीतही लागू करण्याची मागणी केली. केजरीवाल सरकार रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना पायघड्या अंथरत असल्याचाही आरोप केला. सीलिंग करुन लोकांना हैराण करुन सोडले जात असल्याचा आणि या कारवाईत सर्वोच्च न्यायालयाला बदनाम केले जात असल्याचाही आरोप केला.
केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, खासदार, आमदार आणि पूर्वांचलमधील नामवंत नेत्यांचा या मेळाव्यात समावेश होता. लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या या मेळाव्याला मोठे महत्त्व दिले जात आहे. या माध्यमातून दिल्लीत मोठ्या संख्येने राहणाऱ्या पूर्वांचलच्या मतदारांचे तुष्टीकरण केले जात आहे.