तीन राज्यातील दारुण पराभवानंतर भाजपासाठी या राज्यातून आली खूशखबर, मिळवला दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:42 PM2018-12-19T16:42:08+5:302018-12-19T16:44:02+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून झालेल्या दारुण पराभवामुळे हादरलेल्या भाजपाला दिलासा देणारी बातमी आज आली.
चंदिगड - मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून झालेल्या दारुण पराभवामुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, या पराभवानंतर चिंतीत असलेल्या भाजपासाठीहरयाणामधून खूशखबर आली आहे. हरयाणामध्ये झालेला पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. पाचपैकी पाच महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. तसेच भाजपाचेच बहुतांश सदस्यही विजयी झाले आहेत.
यावेळी हरयाणामध्ये महापौरपदासाठी प्रथमच थेट लढत झाली होती. त्यामध्ये करनाल, रोहतक, पानीपत, यमुनानगर आणि हिसार या पाचही महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार विजयी झाले. पैकी पानीपत येथे भाजपाच्या अवनीत कौर 71 हजार मतांनी विजयी झाल्या.
या विजयानंतर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळी करनाल आणि पानीपत येथे भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याचा उल्लेख करत खट्टर म्हणाले की, या मताधिक्यामुळे राज्यातील जनतेने भाजपा सरकारच्या कामकाजावर मोहोर उमटवल्याचे अधोरेखित झाले आहे.
ML Khattar, Haryana Chief Minister: This win in mayoral elections of BJP is a win of the Government's policies and the party's hard work, especially in Panipat where our candidate won by a massive margin pic.twitter.com/gL3316aZAt
— ANI (@ANI) December 19, 2018