भाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 10:26 AM2019-01-20T10:26:18+5:302019-01-20T13:14:57+5:30

भाजपा आमदार साधना सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असून, त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे

BJP women MLAs use offensive word for Mayawati, BSP angry | भाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त

भाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त

ठळक मुद्देभाजपा आमदार साधना सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलीसपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला भाजपाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा टोला हसपा नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी लगावला

लखनौ - लोकसभा निवडणुकीचा मोसम जसा जवळ येत आहे तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. या तापलेल्या वातावरणामध्ये नेत्यांचा तोलही ढळू लागला असून, सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमेकांविरोधात आक्षेपार्ह टीका होत आहे. आता भाजपा आमदार साधना सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असून, त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे.  तसेच महिला आयोगानेही या वक्तव्याची दखल घेऊन साधना सिंह यांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले आहेत. 

चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी मायावतींवर ही टीका केली. ''जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.''  मात्र साधना सिंह एवढ्यावरच थांबल्या नाहीत. मायावती या ना पुरुष दिसतात ना स्त्री, असे अत्यंत आक्षेपार्ह  वक्तव्य त्यांनी केले. दरम्यान, साधना सिंह या अशी मुक्ताफळे उधळत असताना भाजपाचेउत्तर प्रदेशातील महामंत्री पंकज सिंह हे सुद्धा तिथे उपस्थित होते.  




दरम्यान, भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या या टीकेविरोधात बसपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा टोला हसपा नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांनी मायावतींविरोधात ज्या भाषेचा वापर केला आहे. तो त्यांची पातळी दाखवतो. सपा-बसपा आघाडी झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असे मिश्रा म्हणाले.  



 

Web Title: BJP women MLAs use offensive word for Mayawati, BSP angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.