पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजीच भाजपाने मिळविले बहुमत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:45 AM2019-05-17T05:45:58+5:302019-05-17T05:50:01+5:30
भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते.
नवी दिल्ली : बरोबर पाच वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी म्हणजे १६ मे २0१४ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने केंद्रातील सत्ता मिळविली. त्यातही महत्त्वाचे म्हणजे १९८४ नंतर प्रथमच कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल २0१४ साली दिली.
भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर १९८९ पासून २00९ पर्यंत जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही. त्यामुळे या काळात आलेली सर्व सरकारे आघाडीची होती. त्यामुळे २0१४ साली भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत महत्त्वाचे मानले जाते. २०१४ साली भाजपाला २८२ जागांवर विजय मिळाल्याचे संध्याकाळी स्पष्ट झाले. तर सलग १0 वर्षे मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या ४४ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांचे उमेदवार केवळ १५ जागांवरच विजयी झाले.
१५ लाखांची भुरळ
या निवडणुकीत भाजपने अतिशय पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर केला. ‘अच्छे दिन आएंगे’, ‘अब की बार, मोदी सरकार’ आदी घोषणांनी तसेच प्रत्येकाला खात्यात १५ लाख जमा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाने लोकांना त्यावेळी भुरळ घातली होती.