बंगळुरूमध्ये भाजपा कार्यकर्त्याची चाकूनं सपासप वार करुन हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 05:52 PM2018-02-01T17:52:00+5:302018-02-01T17:57:27+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगळुरूमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याची चाकूनं सपासपा वार करुन हत्या करण्यात आली आहे
बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगळुरूमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याची चाकूनं सपासपा वार करुन हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचं नाव संतोष असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (31 जानेवारी) घडली आहे. संतोष जे.सी.नगरमधील चिनप्पा पार्कात भाजपाच्या परिवर्तन रॅलीच्या पार्श्वभूमीवर झेंडे लावण्याचं काम करत होता. यादरम्यान, चार जणांसोबत त्याची वादावादी झाली. यावेळी संतोषवर चाकूनं सपासपा वार करण्यात आले. यावेळी सर्व हल्लेखोर दारूच्या नशेत होते.
भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजारो दिला आहे. मात्र ही घटना राजकीय वादातून घडल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. मात्र दुसरीकडे, भाजपानं संतोषची हत्या राजकीय वादातून झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी वसीम व फिलिप या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाचा सदस्य असलेला संतोष हा वसंत नगर परिसरातील रहिवासी होता. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच ही घटना घडली.
कर्नाटकात भाजपाकडून परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये पार्टीची रॅली काढण्यात येणार आहे. जे.सी. नगर ठाण्यातील पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान असे सांगितले की, संतोषनं या चारही जणांना दारू विकत आणण्यास सांगितली, यावरुन संतोष व चार जणांमध्ये खटके उडाले व बाचाबाची झाली. वादावादीदरम्यानच संतोषवर सपासप चाकूनं वार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी भाजपाकडून करण्यात आलेला दावा फेटाळून लावले आहेत. पोलीस अधिका-यांनी सांगितले की, संतोष व चारही आरोपी शेजारी-शेजारी होते. दरम्यान, कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्रांमध्ये वाढ झाली आहे.