संतापजनक! मारहाण, उठा-बशा अन् 'त्याला' चाटायला लावली थुंकी; चिडलेल्या BJP कार्यकर्त्यांचं गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 11:05 AM2022-01-08T11:05:08+5:302022-01-08T11:09:40+5:30
BJP Video - भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संबंधित व्यक्तीला माफी मागायला भाग पाडून जमिनीवरील थुंकी चाटायला लावली आहे. तसेच 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला देखील भाग पाडलं आहे. धनबादमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांनी या घटनेची दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर धनबादमध्ये भाजपाकडून 'सद्बुद्धी मौन आंदोलन'चं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी वाहतूक पोलिसांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. भाजपचे धनबादचे खासदार पीएन सिंह आणि भाजपा आमदार राज सिन्हा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याच दरम्यान येथील एका व्यक्तीने भाजपाच्या प्रदेश अध्यक्षांना गोळी मारण्याची धमकी दिली. तसेच अपशब्द वापरले.
.@dc_dhanbad कृपया उक्त मामले की जाँच कर दोषियों पर सख्त कार्यवाई करते हुए सूचित करें।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) January 7, 2022
अमन चैन से रहने वाले झारखण्डवासियों के इस राज्य में वैमनस्य की कोई जगह नहीं है।@dhanbadpolice@JharkhandPolicehttps://t.co/XXZFcu9mNo
संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्तीला केली बेदम मारहाण
संतापलेल्या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उठाबशा काढायला लावल्या आहेत. यासोबतच कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याला जमिनीवरील थुंकी चाटायला भाग पाडलं आहे. तसेच 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेय यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल
धक्कादायक प्रकारानंतर अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच ट्विट करून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शांततेत जीवन जगणाऱ्या झारखंडवासीयांच्या राज्यात शत्रुत्वाला जागा असू शकत नाही, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.