अंगावर धावले भाजपचे कार्यकर्ते; गुन्हे दाखल झाले आंदोलक शेतकऱ्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:46 AM2021-07-02T05:46:29+5:302021-07-02T05:46:40+5:30
दिल्लीच्या विविध सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० पासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सात महिन्यांपासून आंदोलन सुरू असलेल्या गाझीपूर येथील शेतकऱ्याच्या व्यासपीठापर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. यात कार्यकर्ते आणि दोघांत झटापट झाली. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
दिल्लीच्या विविध सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० पासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरू आहे. बुधवारी गाझीपूर सीमेवर भाजप आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भाकियुच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला. भाजप नेते अमित वाल्मीकी यांनी केलेल्या तक्रारीत भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला.
nभाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोडही झाली होती. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यासपीठाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. राकेश टिकैत यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली, परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने पोलिसांवर राजकीय दडपण आणले गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.