'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 06:08 PM2019-07-22T18:08:04+5:302019-07-22T18:10:17+5:30
पक्षाकडून ठाकूर यांना कठोर शब्दांत समज
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्यानं भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर अडचणीत आल्या आहेत. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्या विधानावर नेतृत्त्व पक्ष नाराज असल्याचं नड्डा यांनी ठाकूर यांना सुनावलं. यासाठी ठाकूर यांना दिल्लीतील मुख्यालयात बोलावण्यात आलं होतं.
मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना ठाकूर यांनी मोदींच्या 'स्वच्छ भारत' योजनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरुन पक्षानं ठाकूर यांना कठोर शब्दांमध्ये समज दिली. पक्षाच्या योजना आणि विचारधारा यांच्याविरोधात जाणारी विधानं करू नका, अशी सूचना नेतृत्त्वाकडून त्यांना करण्यात आली. ठाकूर २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत.
#WATCH BJP MP from Bhopal, Pragya Thakur in Sehore: Hum naali saaf karwane ke liye nahi bane hain. Hum aapka shauchalaya saaf karne ke liye bilkul nahi banaye gaye hain. Hum jis kaam ke liye banaye gaye hain, vo kaam hum imaandaari se karenge. #MadhyaPradeshpic.twitter.com/VT4pcGKkYx
— ANI (@ANI) July 21, 2019
गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचं विधान ठाकूर यांनी केलं होतं. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली. ठाकूर यांनी त्यांच्या विधानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगली. 'आम्ही गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू', असं ठाकूर म्हणाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकूर यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असं त्या म्हणाल्या होत्या. २६/११ हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापानं मरण पावले, असंदेखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणलं होतं.