मित्रांनी साथ सोडल्याने भाजपची चिंता वाढली; शिवसेना वगळता मोठा पक्ष मदतीला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:33 AM2023-06-11T05:33:52+5:302023-06-11T05:35:02+5:30
यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९ मित्रपक्षांसह ३५२ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभा निवडणुका केवळ ११ महिन्यांवर आलेल्या असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वगळता एनडीएमध्ये कोणताही मोठा प्रादेशिक पक्ष उरलेला नाही. यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये लहान पक्षांना बरोबर घेण्याचे आणि जनता दल (यू)मध्ये फूट पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बिहारमध्ये जद(यू), काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनाही भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. जद(यू) आणि एलजेपीच्या सहकार्याने भाजपने २०१९ मध्ये बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या.
आंध्र प्रदेशात टीडीपी आणि जन सेना पार्टीचे पवन कल्याण यांच्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, तेथे काही जागा जिंकण्याची आशा आहे. कर्नाटकमधील अपमानास्पद पराभवानंतर राज्यात जद(एस)चे नेते एच. डी. देवेगौडा यांच्याशी लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करण्याची तयारी सुरू आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (बादल)बाबत स्थिती अद्याप स्पष्ट व्हायची आहे. भाजपच्या या जुन्या मित्रपक्षाने शेतकरी कायद्यांच्या मुद्द्यांवरून २०२०मध्ये साथ सोडली होती.
२५वा वर्धापन दिन आला आणि गेला
भाजपने १५ मे रोजी एनडीएचा २५वा वर्धापन दिन साजरा केला असता. परंतु तो दिवस आला तसा गाजावाजा न करता गेला; कारण एनडीएमध्ये कोणतेही मोठे पक्ष उरले नाहीत. हरयाणातही भाजपपुढे अडचण निर्माण झाली आहे. तेथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपला पक्ष जेजेपीसाठी लोकसभेच्या चार जागा मागितल्या आहेत.