मुस्लिमांवरील हल्ल्यामुळे भाजपा चिंतेत
By admin | Published: June 28, 2017 12:28 AM2017-06-28T00:28:49+5:302017-06-28T00:28:49+5:30
देशात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने चिंता व्यक्त केली असतानाच, भाजपशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने चिंता व्यक्त केली असतानाच, भाजपशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग व अल्पसंख्यांकासाठीचे मंत्रालय बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सारा समाज चिंतीत आहे, असे भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष अब्दुल रशीद अन्सारी यांनी बोलून दाखवले, तर अल्पसंख्याक आयोग आणि मंत्रालयामुळे फुटीरतावादी मानसिकतेला प्रोत्साहन मिळत आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला.
भाजपचे नेते शहानवाझ हुसैन यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुस्लिमांवर हल्ले होत असल्याने संपूर्ण समाज अस्वस्थ व नाराज आहे, याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांक समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केल्यानंतरही हे प्रकार सुरू आहेत, याचा अन्सारी यांंनी उल्लेख केला. हे सरकार आपले आहे, अशी भावना अल्पसंख्यांक समाजात निर्माण व्हावी, यासाठी भाजपने प्रयत्न करायला हवेत, या घटनांना भाजप जबाबदार नसला तरी हल्ले रोखण्यासाठी पक्षाने पावले उचलायला हवीत, असे अन्सारी म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेने मात्र मुस्लीम व ख्रिश्चन यांना पीडित समाज भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. पण अल्पसंख्याक आयोग त्यांच्याविषयी तसे चित्र निर्माण करीत आहे, अशी तक्रार करून हा आयोग व मंत्रालय बंद करण्याची मागणी गुजरातमध्ये झालेल्या केंद्रीय परिषदेच्या बैठकीत केली.