राहुल गांधींविरुद्ध भाजपच्या लेखींची याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:42 AM2019-04-13T05:42:13+5:302019-04-13T05:42:15+5:30
राफेल प्रकरण; न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका; सोमवारी सुनावणी
नवी दिल्ली : राफेल प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका भाजपच्या खा. मीनाक्षी लेखी यांनी केला आहे.
त्या अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्यात येईल. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी सर्वाेच्च न्यायालयाने आपल्या निकालात ‘चौकीदार चोर है’ असे म्हटल्याचे विधान केले होते. याआधी पंतप्रधान मोदी यांनी सर्वाेच्च न्यायालयाने आपल्या सरकारला राफेल प्रकरणी क्लीन चिट दिली असल्याचे सांगितले होते, याची आठवण त्यांनी करून दिली होती.
सर्वाेच्च न्यायालयाने आधी मोदी सरकारवरील राफेल प्रकरणातील भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले होते. मात्र बुधवारी न्यायालयाने राफेलच्या कागदपत्रांच्या चोरीबाबतच्या एका जनहित याचिकेबाबत नव्याने फेरविचार करण्याचे जाहीर केले होते. या निर्णयाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर है असे म्हटल्याचे विधान केले होते. मीनाक्षी लेखी यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी न्यायालयात म्हणाले की राहुल गांधींनी या विधाने करताना स्वत:ची वाक्ये कोर्टाच्या तोंडी घातली आहेत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे.