भाजपाची ११ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर; सनी देओलला मिळाला डच्चू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:50 PM2024-03-30T22:50:12+5:302024-03-30T22:54:48+5:30
भाजापाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात २४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने ८ वी यादी जाहीर केली असून पंजाबच्या गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओलचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाने ११ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली असून पंजाबमधील ६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, ओडिशातून ३ आणि पश्चिम बंगालमधून २ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या ८ व्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. त्यामुळे, महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावासाठी अजूनही वेट अँड वॉच अशीच परिस्थिती आहे.
भाजापाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात २४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात ३ आणि तिसऱ्या टप्प्यात अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारा देण्यात आली आहे. अद्यापही महाराष्ट्रातील काही जागांवरुन महायुतीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे, सातारा, धाराशिव, नाशिक आणि संभाजीनगर येथील उमेदवारांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्यातच, भाजपाने आज उमेदवारांची ८ वी यादी जाहीर केली. मात्र, या यादीतही महाराष्ट्रातील एकही नाव नाही.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव-2024 के लिए 8वीं सूची में निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/TrHp1SEdnK
— BJP (@BJP4India) March 30, 2024
भाजपाच्या ८ व्या यादीत पंजाबमधील ६ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, गुरुदासपूर येथून अभिनेता सनी देओलचे तिकीट कापण्यात आलं आहे. त्या मतदारसंघातून दिनेश सिंह बब्बू यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. सनी देओलचा लोकसभेतील परफॉर्मन्स अतिशय नगण्य राहिला आहे. तर, अनुपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती. त्यातच, यापुढे आपण कधीही निवडणूक लढवणार नाही, असेही सनी देओलने स्पष्ट केले होते. त्यानंतर, आज पंजाबची यादी जाहीर झाली, तिथे त्याजागी नवीन उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील उर्वरीत उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.