पैलवान आंदोलन प्रकरणात भाजपची कारवाई; ब्रिजभूषण यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 02:04 PM2023-06-02T14:04:59+5:302023-06-02T14:06:27+5:30
Wrestlers Protest: हायकमांडच्या सूचनेनुसार ब्रिजभूषण यांनी 5 जूनची सभा रद्द केली आहे.
Wrestlers Protest : गेल्या अनेक दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. आता याप्रकरणी भाजप हायकमांडने कारवाईचा बडगा उगारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेतृत्वाने ब्रिजभूषण यांना कुस्तीपटूंच्या बाबतीत अनावश्यक वक्तव्ये टाळण्याची सूचना केली आहे. याशिवाय, हायकमांडच्या सूचनेनुसार ब्रिजभूषण यांनी 5 जून रोजी होणारी प्रस्तावित सभादेखील रद्द केली आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ब्रिजभूषण विरुद्ध 2 एफआयआरमध्ये लैंगिक शोषण/विनयभंगाच्या किमान 10 तक्रारी आहेत. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, छातीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करणे किंवा हात ठेवणे, छातीपासून पाठीवर हात फिरवणे, पार्श्वभागावर मारणे अशा तक्रारी एफआयआरमध्ये आहेत.
ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध 21 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती, तर दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिल रोजी या दोन एफआयआर नोंदवल्या. ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दोन्ही एफआयआर आयपीसी कलम 354 (महिलेवर तिची शालीनता भंग करण्याच्या हेतूने हल्ला किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती), 354A (लैंगिक छळ), 354D आणि 34 अंतर्गत आहेत. 353A मध्ये एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आहे.