भाजपची नवी टोपी! गुजरात, हिमाचलमध्ये ‘आप’ला नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 02:40 AM2022-04-24T02:40:00+5:302022-04-24T02:40:17+5:30
आपच्या झाडू चिन्हाच्या टोपीचा मुकाबला करण्यासाठी नव्या डिझाइनची टोपी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीला नियंत्रणात ठेवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पंजाबमधील विजयानंतर आपमध्ये उत्साह आहे. कारण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल देशातील शहरी भागात लोकप्रिय होत आहे. विधानसभा निवडणुका होणाऱ्या या दोन राज्यात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपला काँग्रेसपेक्षाही आपच्या वाढत्या दबदब्याची काळजी आहे. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने हे मान्य केले की, पंजाबच्या ग्रामीण भागात काँग्रेसविरोधी मते मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे झाले नाही.
काय आहे राजकारण?
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहक्षेत्र आहे. तर, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशातील आहेत. काँग्रेसविरोधी मते मिळविण्यासाठी आणि या राज्यात विस्ताराचा आपचा प्रयत्न निष्फळ करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे.
अलीकडेच, जे. पी. नड्डा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशात आपमध्ये फूट पाडली. आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि अन्य नेत्यांचे पक्षात स्वागत करण्यासाठी ते अर्ध्या रात्री शिमला येथे गेले.
असाच प्रयत्न गुजरातमध्येही सुरू आहे. भाजप आपल्या निवडणूक अभियानात बदल करत आहे. आपच्या झाडू चिन्हाच्या टोपीचा मुकाबला करण्यासाठी नव्या डिझाइनची टोपी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी स्वत: भाजपची नवी टोपी परिधान केली होती. या राज्यात भाजप आता काँग्रेस नेत्यांनाही भुरळ घालत आहे.