मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:46 IST2025-04-13T17:31:14+5:302025-04-13T17:46:56+5:30
'४०० हून अधिक हिंदूंना त्यांची घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले', असा आरोप बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.

मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक
वक्फ कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये निरदर्शने सुरू आहेत. उत्तर बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळल्यानंतर अनेक भागात तणाव आहे. हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि १५० जणांना अटक करण्यात आली आहे.
हिंसाचारामुळे हिंदू आपले जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दंगलींमागे जे कोणी आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. देशभरातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी कायद्यांमध्ये हे विधेयक महत्त्वपूर्ण बदल करते.
मुर्शिदाबादच्या हिंसाचारग्रस्त भागात सुती, धुलियान, समशेरगंज आणि जंगीपूरचा समावेश आहे. राज्य पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोलकाता उच्च न्यायालयाने शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी न्यायालयाने म्हटले की, परिस्थिती गंभीर आणि अस्थिर आहे. "लोकांची सुरक्षितता धोक्यात असताना संवैधानिक न्यायालये मूक प्रेक्षक राहू शकत नाहीत आणि तांत्रिक बचावात सहभागी होऊ शकत नाहीत."
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. दंगलींमागे जे कोणी आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. राज्य सरकारने या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा पक्ष वक्फ दुरुस्ती कायद्याचा समर्थक नाही, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.