२०२४ साठी भाजपाचा मोठा डाव, या मुस्लिम नेत्याला बनवलं राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोण आहेत ते? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:59 PM2023-07-29T16:59:29+5:302023-07-29T16:59:57+5:30
Tariq Mansoor : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षसंघटनेतील विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षसंघटनेतील विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या नव्या चेहऱ्यांमधील एका नावाची सकाळपासून खूप चर्चा होत आहे. ते नाव आहे तारिक मन्सूर यांचं. तारिक मन्सूर यांना भाजपाने राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर नियुक्त केले आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते. कुलगुरूपद सांभाळत असतानाच भाजपाने त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले होते.
मन्सूर यांची नियुक्ती करण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त पसमांदा समाजातून येतात. २०२२ मध्ये पसमांदा समाजातून येणाऱ्या दानिश अन्सारी यांची योगी सरकारच्या मंत्रिमंडळात निवड झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे बडे नेते सर्वांची साथ सर्वांचा विकास ही घोषणा देत असतात. तसेच विकासाच्या प्रवाहात प्रत्येक वर्गाला सामावून घेतले जात असल्याचा दावा करतात. मुस्लिमांमधील पसमांदा समाजामध्ये मागासलेपणाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांच्या विकासासाठी कुठलीही मोठी योजना आखली गेली नव्हती, दरम्यान, भाजपाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष तारिक मन्सूर हे अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. कलगुरूपदावरून राजीनामा दिल्यावर उत्तर प्रदेश सरकारने त्यांची विधान परिषदेतील सदस्य म्हणून निवड केली.
मन्सूर यांची २०१७ मध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ मे २०२२ मध्ये समाप्त होत होता. मात्र कोरोनामुळे त्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला. तारिक मन्सूर हे कार्यकाळ सुरू असताना विधान परिषदेवर नियुक्त झालेले पहिले कुलगुरू ठरले होते.