राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 07:35 AM2022-04-02T07:35:16+5:302022-04-02T07:36:26+5:30
ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे संख्याबळ आता १०१ झाले असून, शतक गाठणारा १९८८ नंतरचा पहिलाच पक्ष ठरला आहे.
आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ईशान्येकडील राज्यातून राज्यसभेत प्रथमच काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आसाममधून भाजपच्या पवित्र मार्गारिटा आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाच्या रंग्रा नरजारी यांनी विजय मिळविला आहे. मार्गरिटा यांना ४६, तर नरजारी यांना ४४ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रिपुन बाेरा यांना ३५ मते मिळाली. बाेरा यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. नागालँडमधून भाजपच्या उमेदवार एस. फांगनाॅन यांची बिनविराेध निवड झाली आहे. या राज्यातून प्रथमच राज्यसभेवर महिला प्रतिनिधित्व मिळाले आहे, तर त्रिपुरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी माकपचे उमेदवार व आमदार भानूलाल साहा यांचा पराभव केला.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समीकरण बदलले
n राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० हून अधिक झाले आहे. याचा आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर परिणाम हाेणार आहे.
n अनेक विराेधक निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. आपचेही संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या निवडणुकीसाठी समीकरण बदलले आहे.
आपचे संख्याबळ वाढले
n पंजाब विधानसभेत माेठे यश मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीचेही राज्यसभेतील संख्याबळ वाढले आहे.
n आपने पंजाबमधील पाचही जागा जिंकल्या आहेत.
n त्यामुळे आपचे ८ सदस्य राज्यसभेत झाले आहेत.