सत्ता टिकविण्याचे भाजपापुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:06 AM2019-11-16T06:06:31+5:302019-11-16T06:06:38+5:30
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांत निवडणूक होत आहे.
नवी दिल्ली/रांची : झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांत निवडणूक होत आहे. झारखंडमधील सत्ता टिकविणे हे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये भाजपचे १६ राज्यांत मुख्यमंत्री होते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. सध्या देशात १२ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत. चार राज्यांत भाजपला नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात सहयोगी पक्षासोबत निर्माण झालेला पेच पाहता झारखंडमधील निवडणूक अधिक आव्हानात्मक आहे.
भाजपने आपल्या मित्र पक्षांसोबत आॅल झारखंड स्टुडंट युनियनसोबत (एजेएसयू) जागा वाटप आतापर्यंत पूर्ण केलेले नाही. मित्रपक्ष लोजपा आघाडी करण्यास इच्छुक होता. मात्र, आता या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्ष आघाडीने झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदने जागा वाटप निश्चित केले आहे.
>भाजपचे प्रभारी ओम माथूर रांचीमध्ये
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर हे शुक्रवारी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. भाजप आणि आॅल झारखंड स्टुडंट युनियन यांच्यातील बिघडत्या संंबंधाच्या पार्श्वभूमीवर आज काही ठोस निर्णय होऊ शकतो. भाजपची अखेरची यादीही जाहीर केली जाऊ शकते. माथूर यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही आॅल झारखंड स्टुडंट युनियनच्या भूमिकेची प्रतीक्षा करीत आहोत. भाजपने आतापर्यंत ८१ पैकी ६८ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. हुसैनाबादहून भाजपपुरस्कृत उमेदवार विनोद सिंह यांच्यासह ६९ जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. १२ जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी आहे.