पालिकेत सेनेपुढे भाजपाचेच आव्हान
By admin | Published: September 26, 2014 02:23 AM2014-09-26T02:23:04+5:302014-09-26T02:23:04+5:30
शिवसेना-भाजपातील २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतराच्या चर्चेला आज दिवसभर उधाण आले़ तरीही सत्तेसाठी पालिकेत हे नाते आणखी अडीच वर्षे कायम राहण्याची चिन्हे
मुंबई : शिवसेना-भाजपातील २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतराच्या चर्चेला आज दिवसभर उधाण आले़ तरीही सत्तेसाठी पालिकेत हे नाते आणखी अडीच वर्षे कायम राहण्याची चिन्हे आहेत़ मात्र महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळवणे आणि वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेपुढे विरोधकांपेक्षा भाजपाचेच आता कडवे आव्हान असणार आहे़
महापालिकेमध्ये सत्तेत असूनही शिवसेनेने मलाईदार पदांपासून भाजपाला दूर ठेवले होते़ महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वपूर्ण पदांवर दरवर्षी भाजपा मित्रासाठी पाणी सोडत होती़ महत्त्वाच्या समित्या आपल्याकडे राखून भाजपाच्या तोंडाला शिवसेनेने प्रत्येक वेळा पाने पुसली़ त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या पालिकेतील गटनेत्यांमध्ये खटके उडू लागले होते़ तरीही भाजपाने आपली वेगळी भूमिका मांडण्यास सुरुवात केल्यामुळे वादाची ठिणगी पडली होती़
गेल्या दोन वर्षांमध्ये शिवसेना-भाजपातील मतभेद उघड होऊ लागले होते़ अनेक प्रस्तावांमध्ये भाजपाने विरोधकांची साथ देत शिवसेनेची कोंडी केल्याचेही चित्र दिसून आले आहे़ तरीही फाटलेल्या या नात्याला ठिगळे लावून युतीचा कारभार सुरू होता़ युती तुटल्यानंतरही सत्तेसाठी उभय पक्ष २०१७ पर्यंत एकत्रित राहतील़ परंतु त्याचा परिणाम निश्चितच पालिकेच्या कामकाजावर दिसून येईल, असे संकेत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिले़ (प्रतिनिधी)