जम्मू-काश्मिरात भाजपचा आज सरकारसाठी दावा

By admin | Published: March 26, 2016 01:07 AM2016-03-26T01:07:08+5:302016-03-26T01:07:08+5:30

जम्मू-काश्मिरात मेहबुबा मुफ्ती यांच्या रूपाने पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांकडे सरकारची सूत्रे सोपविली जाणार हे निश्चित झाले आहे. आज शनिवारी पीडीपी- भाजप या दोन्ही पक्षाचे नेते

BJP's claim for government today in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मिरात भाजपचा आज सरकारसाठी दावा

जम्मू-काश्मिरात भाजपचा आज सरकारसाठी दावा

Next

जम्मू : जम्मू-काश्मिरात मेहबुबा मुफ्ती यांच्या रूपाने पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांकडे सरकारची सूत्रे सोपविली जाणार हे निश्चित झाले आहे. आज शनिवारी पीडीपी- भाजप या दोन्ही पक्षाचे नेते राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेत संयुक्तरीत्या सरकारसाठी दावा करणार असून त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या राज्यात असलेल्या राजकीय कोंडीवर पडदा पडेल.
पीडीपीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी ५६ वर्षीय मेहबुबा यांची एकमताने निवड होताच भाजपच्या २५ सदस्यीय विधिमंडळ पक्षाने जम्मूत बैठक घेत निर्मलसिंग यांची नेतेपदी निवड केली. नव्या मंत्रिमंडळात ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनतील. ८७ सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीकडे २७ सदस्य असून भाजपसोबत सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांची शनिवारी वेळ मागणार असल्याचे या पक्षाच्या सूत्रांनी शुक्रवारी रात्री स्पष्ट केले.
तत्पूर्वी मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपालांशी होऊ घातलेली भेट अचानक रद्द केल्यामुळे दरम्यानच्या काळात चर्चेला जोर चढला होता; मात्र दोन्ही पक्षांकडून संख्याबळाचा दावा संयुक्तरीत्या केला जाणार असल्याचे स्पष्ट होताच तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.
भाजप विधिमंडळ पक्षाने माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांचीच नेतेपदी निवड केली.
राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल्याबाबत विचारण्यात आले असता भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी भाजपने राज्यपालांच्या भेटीसाठी कधीही वेळ मागितलेली नव्हती, असे स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

Web Title: BJP's claim for government today in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.