दीड वर्षात उभे राहिले भाजपाचे दिल्लीतील ‘कॉर्पोरेट’ मुख्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:00 AM2018-02-19T02:00:36+5:302018-02-19T03:16:31+5:30
नोटबंदी, जीएसटीचा कोणताही परिणाम न होता दीड वर्षांच्या निर्धारित वेळेतच पूर्ण झालेल्या सत्ताधारी भाजपाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
नवी दिल्ली : नोटबंदी, जीएसटीचा कोणताही परिणाम न होता दीड वर्षांच्या निर्धारित वेळेतच पूर्ण झालेल्या सत्ताधारी भाजपाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. जनसंघ ते भाजपाच्या ऐतिहासिक परिवर्तनाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी यावेळी उपस्थित होते.
अडवाणी व मोदी यांनी कोनशीलेवरील पडद्याची दोरी ओढली. मात्र अडवाणी खेचत असलेली दोरी मध्येच अडकली. पडदाही अडकला. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रसंगावधान दाखवित हातानेच पडदा दूर केला.
भाजपाध्यक्ष अमित शहा, नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्र संरक्षणासाठी झालेल्या सर्व आंदोलनाचे नेतृत्व भाजप अर्थात तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांनीच केल्याचा दावा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे आणीबाणीची आठवण करून दिली. राष्ट्रभक्तीसाठी आम्ही सदैव प्रतिबद्ध आहोत. कार्यकर्त्यांच्या आशा आणि स्वप्ने येथे पूर्ण होतील, असे ठोस प्रतिपादन मोदी यांनी केले.
न्यायालयाच्या आदेशामुळे स्थलांतर
‘ल्यूटन्स झोन’मधून कार्यालये स्थलांतरित करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना केली होती. कार्यालय स्थलांतरित करणारा भाजप पहिला पक्ष ठरला आहे. कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांची मुख्यालयेही याच दीनदयाल मार्गावर आहेत.
असे आहे भाजपाचे नवे मुख्यालय
‘कमळ’चिन्हाप्रमाणे वास्तूची रचना.
गुलाबी रंगाचा दगड वापरण्यात आला.मुख्य इमारत ७ मजली, त्यामध्ये तीन विभाग, तीन मजली दोन स्वतंत्र इमारतींमध्ये पक्षाध्यक्ष व अन्य नेत्यांसाठी निवास व्यवस्था, अनेक उपहारगृहे. प्रवेशव्दारावर नेत्यांची भव्य कट्आऊट्स.
मुख्य इमारतीमध्ये लहान मोठ्या ७० खोल्या आहेत. २ भव्य कान्ॅफरस हॉल. ग्रंथालय, संशोधन कक्ष. मुख्यालयाच्या आवारातच कमळाकृती तलाव. सोलर पॅनल आणि बायो टॉयलेट, पावसाचे पाणी साठविण्याची सोय, ‘वाय-फाय’ सारख्या आधुनिक सुविधा. जिल्हा, प्रदेश मुख्यालयांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा.