ईव्हीएम नसल्यास २0१९ मध्ये भाजपाचा पराभव - मायावती; मतदानासाठी मतपत्रिका वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:11 AM2017-12-03T01:11:41+5:302017-12-03T01:11:51+5:30
येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले.
लखनौ : येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले.
उत्तर प्रदेशातील काल जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालात भाजपने १६ पैकी १४ महापौरांच्या जागा जिंकल्या आहेत. उरलेल्या दोन जागा बसपाने जिंकल्या. या निवडणुकीत जेथे मतपत्रिकांचा वापर झाला तेथे भाजपला कमी मते पडली असून, ईव्हीएम वापरलेल्या ठिकाणी जास्त मते पडली आहेत, असा आरोप होत आहे. त्याचा संदर्भ देत मायावती यांनी हे वक्तव्य केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू भदन्त प्रज्ञानंद यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मायावती म्हणाल्या लोकांचा पाठिंबा आहे, देश आपल्या पाठीशी आहे असा भाजपचा दावा असेल, तर त्यांनी ईव्हीएम बाजूला सारून मतपत्रिकांवर मतदान घ्यायला हवे. तसे झाले तर २०१९ भाजपचा पराभव निश्चित आहे, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते.(वृत्तसंस्था)
सर्वांची मते मिळाली
मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढविली. आम्हाला दलितांबरोबरच सर्व मागास जाती, सवर्ण जाती, अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम अशी सर्वांची मते मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. अन्यथा आमचे आणखी उमेदवार निवडून आले असते.